Thursday, 20 October 2022

अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका"


 *कन्या महाविद्यालय,मिरज येथे "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका" या विषयावरील व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न*


कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील महिला किती संरक्षित,सुशिक्षित आणि पोषित आहेत यावरून ठरवला जातो असे प्रतिपादन प्रा.डॉ.सौ.सिंधुताई कोरे यांनी केले.मिरजेतील कन्या महाविद्यालयात  "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका" या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष  डॉ.अर्जुनराव महाडिक उपस्थित होते.

     मिरजेतील कन्या महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद,कोल्हापूर (सुयेक),अर्थशास्त्र विभाग,कन्या महाविद्यालय मिरज आणि मिरज महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानमालेतील १५ वे पुष्प "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका"

 या विषयावरील व्याख्यानाने संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलनाने झाली.स्वागत व प्रास्ताविक कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेची भूमिका व्यक्त करून आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचे असणारे महत्व विशद केले.अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ.सुजाता आवटी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.सुयेक चे कार्याध्यक्ष प्रा.एम.जी.पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करून सुयेकच्या कार्यपद्धतीची आणि विद्यार्थ्यांसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या योजनांची माहिती विद्यार्थिनीना दिली.तसेच याप्रसंगी सुयेकचे अध्यक्ष डॉ.राहुल म्होपरे यांनी दिलेल्या शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि सूयेकच्या माजी अध्यक्षा प्रा.डॉ.सौ.सिंधुताई कोरे यांनी "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका" या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना देशातील विकासामध्ये स्त्रियांचे असणारे योगदान विशद करून कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील महिला किती संरक्षित,सुशिक्षित आणि पोषित आहेत यावरून ठरवला जातो असे प्रतिपादन केले.तसेच जोपर्यंत आपल्या देशातील महिला अशिक्षित राहून फक्त परंपरागत व्यवसायात अडकून राहतील तोपर्यंत आपल्या देशातील स्त्रियांचा अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही हातभार लागणार नाही,आणि म्हणूनच स्त्रियांनी घराबाहेर पडले पाहिजे असे सांगून स्वातंत्र्यानंतर औद्योगिक तसेच कृषी,सेवा क्षेत्राचा जो विकास झाला त्यात स्त्रियांचा असणारा सहभाग हा निश्चितच मोलाचा आहे असे प्रतिपादन  केले.याचबरोबर राजकारणात असणारे स्त्रियांचे महत्व,लोकसंख्येचा प्रश्न,स्त्री - पुरुष समानता,महिला सबलीकरण अशा अनेक विषयबिंदूना त्यांनी स्पर्श केला.शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ.अर्जुनराव महाडिक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचालीचे स्वरूप सांगून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचा असणारा सहभाग याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय,मिरजचे माजी प्र.प्राचार्य सुभाष शेळके,सुयेक चे माजी कार्यवाह बी.जी.कोरे, विलिंग्डन महाविद्यालय,सांगलीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख मनोहर कोरे,प्रा.संदीप चव्हाण प्रमुख उपस्थित म्हणून होते.कार्यक्रमाचे आभार मिरज महाविद्यालय,मिरजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.डॉ.राजेंद्र जेऊर यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.सागर पाटील आणि प्रा.विनायक वनमोरे यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी सहकारी प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://fb.watch/ggsp8Wsbqb/


*व्याख्यान पाहण्यासाठी वरील लिंक ला टच करा.*

1 comment:

  1. Important guidance on the role of women in the Indian economy has always been important.very nice

    ReplyDelete