Wednesday, 14 December 2022

बचती पेक्षा योग्य ठिकाणी गुंतवणुकीची आवश्यकता . सौ. मोनिका बलदवा*






*बचती पेक्षा योग्य ठिकाणी गुंतवणुकीची आवश्यकता . मोनिका बलदवा*


मिरज : कन्या महाविद्यालय मिरज येथे अर्थशात्र आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक जागरूकता कार्यक्रम अंतर्गत 'शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या संधी' या विषयावर आर्थिक सल्लागार सौ. मोनिका बलदवा ( जयसिंगपूर ) यांचे  व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानात पुढे बोलताना मोनिका बलदवा मॅडम म्हणाले की, प्रत्येकानी स्वतः ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेळीच पैश्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. सुयोग्य पद्धतीने केलेले नियोजन हेच भविष्य काळातील गरजा पुर्ण आणि अडचणी दूर करु शकते. सर्वांनी बचती पेक्षा योग्य ठिकाणी गुतवणुकीसाठी अग्रक्रम दिले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. गुंतवणुकी साठी बँक डीपॉजीट, सोने आणि रियल इस्टेट इ. पारंपरिक मार्गाचा विचार न करता शेअर, म्युचवल फंड अशा आधुनिक  गुंतवणुकीच्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे. यामध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक फायदेशीर ठरतात असे त्यानी स्पष्ट केले.  कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री.उल्हास माळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुजाता आवटी यांनी केले तर आभाराचे काम वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शर्वरी कुलकर्णी मॅडम यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी  कन्या महाविद्यालयातील  प्राध्यापक विनायक वनमोरे व प्रा.शेळके सर, प्रा नाईक मॅडम. आणि  विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Thursday, 20 October 2022

अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका"


 *कन्या महाविद्यालय,मिरज येथे "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका" या विषयावरील व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न*


कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील महिला किती संरक्षित,सुशिक्षित आणि पोषित आहेत यावरून ठरवला जातो असे प्रतिपादन प्रा.डॉ.सौ.सिंधुताई कोरे यांनी केले.मिरजेतील कन्या महाविद्यालयात  "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका" या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष  डॉ.अर्जुनराव महाडिक उपस्थित होते.

     मिरजेतील कन्या महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद,कोल्हापूर (सुयेक),अर्थशास्त्र विभाग,कन्या महाविद्यालय मिरज आणि मिरज महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानमालेतील १५ वे पुष्प "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका"

 या विषयावरील व्याख्यानाने संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलनाने झाली.स्वागत व प्रास्ताविक कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेची भूमिका व्यक्त करून आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचे असणारे महत्व विशद केले.अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ.सुजाता आवटी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.सुयेक चे कार्याध्यक्ष प्रा.एम.जी.पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करून सुयेकच्या कार्यपद्धतीची आणि विद्यार्थ्यांसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या योजनांची माहिती विद्यार्थिनीना दिली.तसेच याप्रसंगी सुयेकचे अध्यक्ष डॉ.राहुल म्होपरे यांनी दिलेल्या शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि सूयेकच्या माजी अध्यक्षा प्रा.डॉ.सौ.सिंधुताई कोरे यांनी "अमृत महोत्सवी वर्ष : भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांची बदलती भूमिका" या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना देशातील विकासामध्ये स्त्रियांचे असणारे योगदान विशद करून कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील महिला किती संरक्षित,सुशिक्षित आणि पोषित आहेत यावरून ठरवला जातो असे प्रतिपादन केले.तसेच जोपर्यंत आपल्या देशातील महिला अशिक्षित राहून फक्त परंपरागत व्यवसायात अडकून राहतील तोपर्यंत आपल्या देशातील स्त्रियांचा अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही हातभार लागणार नाही,आणि म्हणूनच स्त्रियांनी घराबाहेर पडले पाहिजे असे सांगून स्वातंत्र्यानंतर औद्योगिक तसेच कृषी,सेवा क्षेत्राचा जो विकास झाला त्यात स्त्रियांचा असणारा सहभाग हा निश्चितच मोलाचा आहे असे प्रतिपादन  केले.याचबरोबर राजकारणात असणारे स्त्रियांचे महत्व,लोकसंख्येचा प्रश्न,स्त्री - पुरुष समानता,महिला सबलीकरण अशा अनेक विषयबिंदूना त्यांनी स्पर्श केला.शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ.अर्जुनराव महाडिक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचालीचे स्वरूप सांगून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचा असणारा सहभाग याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय,मिरजचे माजी प्र.प्राचार्य सुभाष शेळके,सुयेक चे माजी कार्यवाह बी.जी.कोरे, विलिंग्डन महाविद्यालय,सांगलीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख मनोहर कोरे,प्रा.संदीप चव्हाण प्रमुख उपस्थित म्हणून होते.कार्यक्रमाचे आभार मिरज महाविद्यालय,मिरजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.डॉ.राजेंद्र जेऊर यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.सागर पाटील आणि प्रा.विनायक वनमोरे यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी सहकारी प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://fb.watch/ggsp8Wsbqb/


*व्याख्यान पाहण्यासाठी वरील लिंक ला टच करा.*

Friday, 9 September 2022

भारतातील धवल क्रांतीचे जनक व्हर्गिस कुरियन

 बालपण आणि शिक्षण


 भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉ. व्हर्गिस कुरियन (Verghese Kurien) यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 केरळ राज्यातील कोझिकोड (कालिकत) शहरात झाला. 

त्याचे शालेय शिक्षण तामिळनाडूतील जिल्हा इरोड गोबीचेट्टीपालयम गावात डायमंड जुबिली हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील सरकारी रूग्णालयात शल्यतज्ज्ञ होते. 

कुरियन यांनी मद्रासच्या लॉयोला कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळविली. विद्यार्थी दशेत त्यांनी लॉयोला कॉलेजचे क्रिकेट, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि टेनिसमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

त्यांनी गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मद्रास (सध्याच्या चेन्नई) विश्वविद्यालयाची यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) पदवी मिळविली.

अल्प काळासाठी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीत (TISCO) नोकरी करून त्यांनी इंपिरियल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. सध्या ही संस्था बंगळूरूत असून आता या संस्थेचे नाव नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट सदर्न रिजनल सेंटर आहे. 

डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी त्यांना मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश हवा होता. प्रवेशासाठी कुरियन यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. पण प्रवेशपूर्व अट म्हणून मेटॅलर्जीत अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीबरोबर डेअरी इंजिनीअरिंग हा दुय्यम विषय घेणे अनिवार्य होते. या अटींची पूर्तता करून मिशिगनमधून मास्टर्सची पदवी मिळवून ते भारतात परतले. आणंदच्या गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरीत पाच वर्षांच्या कालावधीसाठी रुजू झाले. तेथे त्यांचा गांधी विचारांचा पगडा असलेले कार्यकर्ते त्रिभुवनदास पटेल यांच्याशी परिचय झाला.

त्रिभुवन भाई पटेल यांच्या सहकार्यानं खेडा जिल्हा सहकारी संस्था

त्रिभुवनदास यांना त्याकाळी लहान दूध उत्पादकांसाठी आणंद येथे सहकारी दूध संघटना स्थापन करायची होती. मध्यंतरीच्या काळात 1952-53 मध्ये डॉ. कुरियन यांनी भारत सरकारच्या पुरस्काराने न्यूझीलंडमध्येही दुग्ध यांत्रिकी शिक्षण घेतले. तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील सहकारी दूध व्यवस्थेचाही अभ्यास केला. 

त्रिभुवनदास पटेल यांचा उपक्रम भावल्यामुळे सुरक्षित सरकारी नोकरी सोडून कुरियन यांनी खेडा जिल्ह्यातील चळवळीत उडी घेतली. 

डॉ. कुरियन यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या सहकारी दूध व्यवस्थेच्या अभ्यासाचा खेडा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रॉड्युसर्स युनियन लिमिटेड (KDCMPUL) म्हणजेच अमूलची बांधणी करण्यासाठी उपयोग केला.

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अमूल डेअरी प्रकल्पाचे उद्घाटन झाले आणि खुद्द पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांचे कौतुक केले. त्यामुळे डॉ. कुरियन यांना काम करण्यास आणखी हुरूप आला आणि त्यांनी अमूलच्या स्थापनेत आणि वाढीत मोलाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या प्रयत्नाने अमूलसारख्या संस्था ठिकठिकाणी उभ्या करून भारतात लाखो लहान दूध उत्पादकांच्या एकत्रित परिश्रमाने दूध उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविता आले. तसेच दुधाची त्वरित फायदेशीर विक्री होऊ लागली. 

शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचा फायदा झाला. या धवल क्रांतीमुळे अक्षरश: लाखो ग्रामीण, अर्ध-नागरी भागातील लोकांना विशेषतः महिलांना घरात वा घराजवळ रोजगार मिळाला. कुपोषण आणि गरीबी कमी होण्यास मदत झाली. 

भारत दूध उत्पादनात अग्रेसर होऊन अमूल आणंद हा तीस लाख लहान दूध उत्पादकांचा समूह देशासाठी दुधाचा कटोरा ठरला. स्वस्त आणि शुद्ध दुधाच्या पुरवठ्यामुळे नेस्ले आणि पोलसन सारख्या आंतरराष्ट्रीय दूध उत्पादकांची मक्तेदारी संपली.


म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया


दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


 डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीडीबी' ने 'ऑपरेशन फ्लड' (धवल क्रांती) सुरु केलं. अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. 


डॉ. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची (जीसीएमएमएफ) स्थापना केली. 2007 पर्यंत सलग 34 वर्षे ते या महासंघाच्या अध्यक्षपदी होते. ही संस्था 'अमूल' डेअरी उत्पादनांची निर्मिती करते.


 सारे जग गाईच्या दुधापासून बनवलेली भुकटी वापरत होते. तर भारतात विशेषतः उत्तर व मध्य भारतात म्हशी पालनाचे प्रमाण मोठे आहे. ही बाब जाणून डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया साधली. यामुळे भारतात दूध प्रक्रिया क्षेत्रात क्रांती झाली. यामुळे जगात अग्रेसर असलेल्या 'नेस्ले' कंपनीला 'अमूल' टक्कर देऊ शकली. डॉ. कुरियन यांनी केलेल्या या नव्या प्रयोगामुळे त्यांना 'मिल्कमॅन ऑफ इंडिया'चा किताब मिळाला.


डॉ. कुरियन यांनी 1955 मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन जगातील पहिला म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्याचा प्रकल्प आणंदमध्ये केला.


 दुधातील पाण्याचे प्रमाण कमी करून अतिशय दाट (कन्डेस्ड) टिकाऊ दूध बनवण्याचे तंत्र कुरियन यांचे अमेरिकेत राहणारे अभियंता वर्गमित्र, एच. एम. दलाया यांनी विकसित केले होते. म्हशीच्या दुधाची भुकटी आणि दूध दाट टिकाऊ करणे या दोन्ही प्रकल्पांतही त्यांना एच. एम. दलाया यांची मदत झाली.

डॉ. कुरियन: ऑपरेशन फ्लड उर्फ धवल क्रांती चे जनक 

सहकारी दूध चळवळीचा देशभर विकास करण्याच्या हेतूने भारत सरकारने 1965 साली लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड ही संस्था स्थापन करण्यात आली. या बोर्डावर डॉ. कुरियन यांची संस्थापक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली.

त्यांनी दुधाचा महापूर ही योजना अमलात आणली. त्यानुसार तब्बल 700 शहर आणि जवळची गाव यातून दुधाचे जाळं निर्माण केलं. "ऑपरेशन फ्लड उर्फ धवल क्रांती" नावाने प्रसिद्ध अशा या उपक्रमामुळे भारतातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढले.

पूर्वी लहान प्रमाणात दूध उत्पादन करणाऱ्याना दूध थंड जागी साठविण्यास, मुंबईसारख्या मोठ्या, खात्रीच्या आणि वाढत्या पण दूरच्या बाजारात दूध वाहून नेण्यास मोठ्या दूध उत्पादकांच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागे. ते अर्थातच आडवणूक आणि नफेखोरी करत. त्यातून छोट्या दूध उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष होता.


 गुजरात सहकारी दूध विक्री महासंघाचा अमूल प्रकल्प आकाराला आल्यावर अल्प दूध उत्पादकांना न्याय मिळू लागला. ‘अमूल’ हा शब्द त्यांच्या संस्थेने बऱ्याच विचारमंथनानंतर अमूल्य अशा अर्थी पण बोलायला, लिहायला सोपा म्हणून स्वीकारला होता. 


अमूलच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील दूध उत्पादन 1960 मध्ये दरवर्षी 200 लाख मेट्रिक टन होते. ते पन्नास वर्षात वाढून 2011 मध्ये सहा पट म्हणजे 1200 लाख मेट्रिक टन झाले.


 एके काळी दुधाचे दुर्भिक्ष्य असलेला भारत योग्य धोरण आणि काही दशकांचे प्रयत्न यामुळे दूध उत्पादनात अग्रेसर ठरला.


 डॉ. कुरियन यांना भारतासारख्या देशातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढविण्याच्या कामगिरीबद्दल " वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशन"तर्फे 1989 चे "वर्ल्ड फूड प्राइझ" देण्यात आले.


 या संस्थेला त्यांचा जनतेला पोषण पुरवताना उत्पादनवाढी इतकेच प्रभावी व्यवस्थापन आणि वितरणही महत्त्वाचे आहे, हा विचार आवडला.


डॉ. कुरियन यांनी 1970 मध्ये "ऑपरेशन फ्लड" म्हणजेच "दूधाचा महापूर" ही योजना राबवली. या योजनेमुळे भारतात      " श्वेत क्रांती" संकल्पना उदयास आली. भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला.




डॉ. व्हर्गिस कुरियन: संस्थाची स्थापना


डॉ.कुरियन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 हून अधिक संस्थाची स्थापना केली.


डॉ. कुरियन यांनी व्यावसायिक विशेषज्ञ निवडून अमूलसाठी व्यापारी चिन्ह तयार करवून घेतले. त्या चिन्हाची 1957 साली अधिकृत नोंदणी केली. या चिन्हाद्वारे एक छोटी, मिश्कील, चुणचुणीत मुलगी 1967 पासून अमूलची लाडकी प्रतिनिधी म्हणून ग्राहकांसमोर आणली. तिच्या तोंडचे ‘अटरली बटरली डेलिशियस’ ऐकत, वाचत ग्राहक अमूलचे लोणी देशभर खरेदी करू लागले. 


1979 मध्ये डॉ. कुरियन यांनी "इन्स्टिटयूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद" अशी संस्था सुरू करून सहकारी संस्था व्यावसायिक कुशलतेने चालविल्या जातील यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करून ठेवली. डॉ. कुरियन यांच्या कर्तबगारीचा लाभ गुजरात बाहेरही अनेकांना झाला. 


कर्नाटकमधील नंदिनी, राजस्थान मधील सरस, बिहार येथील सुधा या व्यापारी नावांनी किफायतशीर किमतीला विकले जाणारे दूध ही कुरियन यांची किमया आहे.


 भारताचे शेजारी देश पाकिस्तान, चीन, श्रीलंका तसेच रशिया यांनाही कुरियन यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा त्यांच्या दूध पुरवठा योजना सुधारण्यात झाला.


कुरियन यांची योजकता केवळ दुधापुरतीच मर्यादित राहिली नाही. तेलबिया आणि खाद्य तेलाच्या बाबतीतही भारत स्वयंपूर्ण व्हावा अशी भारत सरकारची आकांक्षा होती. पूर्वानुभवामुळे कुरियन यांना हे केवळ तीन वर्षांत साध्य झाले. 


गुजरात मध्ये तेलीया राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही मोजक्या कुटुंबांकडे खाद्य तेलाच्या व्यापाराची सूत्रे होती. डॉ. कुरियननी कठोरपणे त्यांची मक्तेदारी मोडून काढली.


जुने, आजारी, वापरात नसलेले पण परवाना धारक तेल कारखाने ताब्यात घेऊन कार्यान्वित केले. थोड्याच काळात " धारा" या व्यापारी नावाने माफक किमतीला ग्राहकांना अधिक मागणी असलेले शेंगदाणा तेल मिळू लागले. तेल आयातीवर खर्च होणारे महागडे परकीय चलन वाचू लागले.




पुरस्कार व सन्मान


डॉ.कुरियन यांना प्रदान करण्यात आलेले प्रतिष्ठेचे पुरस्कार 


1963 -रमन मेगसेसे पुरस्कार- रमन मग्सेसे पुरस्कार फाउंडेशन

1965 -पद्मश्री - भारत सरकार

1966 -पद्मभूषण- भारत सरकार

1986 -कृषि रत्न- भारत सरकार

1986 -वाटलर शांति पुरस्कार- कार्नेगी फाउंडेशन

1989 -डॉ.कुरियन यांना भारतासारख्या देशातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढविण्याच्या कामगिरीबद्दल " वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशन"तर्फे 1989 चे "वर्ल्ड फूड प्राइझ" देण्यात आले.

1991 -Distinguished Alumni -मिशिगन स्टेट विश्वविद्यालय

1993- इंटरनेशनल पर्सन ऑफ़ द इयर- वर्ल्ड डेरी एक्सपो

1999- पद्म विभूषण- भारत सरकार

डॉ.कुरियन यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे जनसामान्यांच्या लेखी ते भारताचे दुग्धपुरूष होते. 


देशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना त्यांनीच मांडली. कुरीयन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो.




ग्रंथ निर्मिती


डॉ.कुरियन यांनी आपल्या आठवणी आणि विचार तीन पुस्तकांत नोंदवून ठेवल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावे  .


 1. ‘आय टू हॅड ड्रीम’,  


 2. ‘द मॅन हू मेड द एलिफंट डान्स’ आणि 


 3. ‘ॲन अनफिनिश्ड ड्रीम.’




निधन


भारताचे दुग्धपुरूष ( मिल्कमॅन ऑफ इंडिया') तथा भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॉ. व्हर्गिस कुरियन यांचा गुजरातेतील नडियाद येथे मूत्रपिंडांच्या आजारामुळे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना 9 सप्टेंबर 2012 त्यांचे रुग्णालयात निधन झाले.