Thursday, 17 August 2023

"नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी"

 


*कन्या महाविद्यालय,मिरज येथे "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी" या विषयावरील व्याख्यान संपन्न*


      भारतातील ज्ञानपरंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे,नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नव - नवीन कौशल्ये विकसित करणे हे नवीन शैक्षणिक धोरणासमोर आव्हान असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे यांनी केले.मिरजेतील कन्या महाविद्यालयात "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी" या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास माळकर उपस्थित होते.

     दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी,मिरजचे कन्या महाविद्यालय मिरज आणि शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे  महाविद्यालय,मिरज यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित केलेल्या  

*"नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी"* या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले होते.स्वागत व प्रास्ताविक डॉ.माधुरी देशमुख यांनी केले.अर्थशास्त्र विभागातील प्रा.संतोष शेळके यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.

        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अनिलकुमार वावरे यांनी "नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी" या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना

पदवी आणि पदव्युत्तर सह इतर काही अभ्यासक्रमांसाठी आराखडा आणि श्रेयांक (क्रेडिट) पद्धत नेमकी कशी असणार या संदर्भात मार्गदर्शन केले.हे विषद करत असताना त्यांनी एकसमान क्रेडिट पद्धती,चार वर्षांच्या पदवीचा पर्याय आणि मल्टिपल एन्ट्री आणि मल्टिपल एक्झिट याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच देशातील विकासामध्ये विद्यार्थ्यांचे असणारे योगदान सांगून कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील तरुण विद्यार्थी किती सक्षम आहे यावरून ठरवला जातो असे प्रतिपादन केले.याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे आपल्या सोबत संधी आणि आव्हाने घेऊन आले आहे असे सांगून आवडीनुसार शिक्षण आणि अभ्यासक्रम निवडीच्या लवचिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात गरजेनुसार प्रवेश घेऊ शकणार आहेत.तथापि शिक्षण व्यवस्थेतील एक जबाबदार घटक म्हणून प्रशासन,शिक्षक,विद्यार्थी,पालक, व्यवस्थापन इत्यादींना अनेक बदलांना सामोरे जावे लागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात असणारी शिक्षकांची भूमिका,सब्जेक्ट बास्केट,अकॅडमीक बँक क्रेडिट सिस्टीम,डी.जी.लॉकर अशा नवीन शैक्षणिक धोरणातील अनेक विषयबिंदूना त्यांनी स्पर्श केला.कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उल्हास माळकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून नवे धोरण हे शैक्षणिक समानतेचे,वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे व मानवाच्या विकासात मोठी भर टाकणारे असल्याचे म्हटले.तसेच या धोरणाच्या अंमलबजावणीतील प्रमुख घटक शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्ये शोधत त्यांचा सर्वांगीण विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रमुख उपस्थित म्हणून शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अर्जुनराव महाडिक उपस्थित होते.

        सदर कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय,मिरजचे प्रा.संजय पाटील,प्रा.सौ.स्वाती हाके, विलिंग्डन महाविद्यालय,सांगलीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख मनोहर कोरे,कन्या महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या उप-प्राचार्या डॉ.सुनीता माळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.यशवंत हरताळे यांनी मानले.सूत्रसंचालन कन्या महाविद्यालय,मिरजचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनायक वनमोरे यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी सहकारी प्राध्यापक,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने केले.

No comments:

Post a Comment