डॉ.भीमराव रामजी
आंबेडकर तथा डॉ.
बाबासाहेब आंबेडकर
:भारतीय राज्यघटनेचे
शिल्पकार, भारतरत्न,
बोधिसत्व
जयंती - 14 एप्रिल
महानिर्वाण दिन - 6 डिसेंबर
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. 2012 मध्ये "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेल
उच्च शिक्षण:
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर, 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. 1950 च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय:
14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू (सध्या डॉ. आंबेडकर नगर) येथे जन्म झाला.
1896 मध्ये आई भीमाबाईंचे निधन झाले.
7 नोव्हेंबर1900 मध्ये साताऱ्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) पहिली इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता.
नोव्हेंबर 1904 मध्ये इयत्ता 4 थी उतीर्ण झाले होते.
डिसेंबर 1904 मध्ये एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.
4 एप्रिल 1906 मध्ये 9 वर्षीय रमाबाई वलंगकर यांच्यासोबत विवाह झाला. हा विवाह रात्री 9:00 वाजता भायखळा येथील भाजी मार्केट मध्ये पार पडला होता.
1907 मध्ये 750 पैकी 382 गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा उतीर्ण. केळुस्कर गुरुजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" पुस्तक भेट रुपात मिळाली.
3 जानेवारी 1908 मध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेश, भगवान बुद्धांचे चरित्र वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत झाले होते.
12 डिसेंबर 1912 मध्ये मुलगा यशवंत यांचा जन्म झाला होता.
१९१३ जानेवारी 1913 मध्ये बी.ए. पदवी परीक्षा मुंबई विद्यापीठातून उत्तीर्ण (पारशी आणि इंग्रजी हे मुख्य विषय) झाले.
2 फेब्रुवारी 1913 मध्ये वडील रामजी आंबेडकर यांचे निधन झाले होते.
एप्रिल 1913 मध्ये बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी निवड केली होती.
20 जुलै 1913 मध्ये अमेरिकेच्या न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता.
1914 मध्ये कोलंबिया विद्यापीठात लाला लजपतराय यांचेशी भेट झाली होती.
2 जून 1915 मध्ये “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून एम.ए. पदवी मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता. सोबत समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय घेऊन उत्तीर्ण झाले.
जून 1916 मध्ये "नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया- अ हिस्टॉरिकल ॲंड ॲनॅलिटिकल स्टडी" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारला व पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी प्रदान केली. लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
9 मे 1916 मध्ये प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये "कास्ट इन इंडिया" हा मानवंशशास्त्रीय व वैचारिक प्रबंध वाचला होता.
ऑक्टोबर 1916 मध्ये अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स संस्थेत प्रवेश मिळवला होता.
11 नोव्हेंबर 1916 कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश घेतला.
जून 1916 मध्ये बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, त्यामुळे लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले होते.
सप्टेंबर 1917 मध्ये बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले होते.
1918 मध्ये साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष दिली.
10 नोव्हेंबर 1918 मध्ये मुंबईतील सिडनहॅंम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ) झाले.
16 जानेवारी 1919 मध्ये ‘महार’ या टोपण नावाने "द टाइम्स ऑफ इंडिया" मध्ये लिखाण केले.
31 जानेवारी 1920 मध्ये साप्ताहिक "मूकनायक" सुरू केले.
21 मार्च 1920 मध्ये माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे शाहू महाराज अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण दिले.
मे 1920 मध्ये शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले होते.
5 जुलै 1920 मध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण बर्टाड रसेल यांनी "प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन" या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले होते.
एप्रिल 1921 मध्ये “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व" या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
जून 1921 मध्ये लंडन विद्यापीठाने "प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या प्रबंधासाठी एम.एस्सी. (अर्थशास्त्र) पदवी प्रदान केली.
एप्रिल 1922 मध्ये अर्थशास्त्रात तिसरी डॉक्टरेट मिळवण्यासाठी जर्मनीतील बॉन विद्यापीठामध्ये गेले होते.
22 जून 1922 मध्ये ग्रेज इन विद्यापीठाने बार-ॲट-लॉ (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली.
ऑक्टोंबर 1922 मध्ये लंडन विद्यापीठात "द प्रोब्लेम ऑफ रुपी" हा प्रबंध डी.एससी' साठी सादर केला होता.
एप्रिल 1923 मध्ये जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले होते.
4 ऑगस्ट 1923 मध्ये बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस.के. बोले यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
नोव्हेंबर 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने डी.एससी. ही डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
20 जुलै 1924 मध्ये मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, त्याचे घोषवाक्य "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" होते.
4 जानेवारी 1925 मध्ये उच्च शाळांत शिकणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूरमध्ये वसतिगृह सुरू केले.
15 डिसेंबर 1925 मध्ये हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
जानेवारी 1927 मध्ये मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली होती.
1 जानेवारी 1927 मध्ये भिमा कोरेगांवच्या विजय स्तंभाला भेट दिली. महार सैनिकांना वंदन केले.
मार्च 1927 मध्ये डॉ. आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली.
19-20 मार्च 1927 मध्ये डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. दि. 20 ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले होते.
3 एप्रिल 1927 मध्ये पाक्षिक "बहिष्कृत भारत" सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली होती.
3 मे 1927 मध्ये कल्याण जवळील बदलापुर गावांत आयोजित शिवाजी जयंती समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
8 जून 1927 मध्ये "इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया" या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली.
4 ऑगस्ट 1927 मध्ये महाड नगरपालिकेने 1924 साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
सप्टेंबर 1927 मध्ये "समाज समता संघ" स्थापन केला.
ऑगस्ट 1928 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
3 मार्च 1930 मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर 1935 पर्यंत सुरू राहिले.
17-21 नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.
14ऑगस्ट 1931 मध्ये मुंबईतील मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी यांची भेट झाली.
20 ऑगस्ट 1932 मध्ये भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
24 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करारावर स्वाक्षरी केली.
1934 मध्ये परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
26 मे 1935 मध्ये पत्नी रमाई यांचे निधन
1 जून 1935 मध्ये मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.
13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे हिंदू धर्मांतराची घोषणा केली होती.
ऑगस्ट 1936 मध्ये “स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
18 मार्च 1937 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या, दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.
डिसेंबर 1940 मध्ये रमाबाईंना समर्पित असलेले "थॉट्स ॲान पाकिस्तान" पुस्तक प्रकाशित
18 जुलै 1942 मध्ये "ॲाल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन" ची नागपूर येथे स्थापना.
20 जुलै 1942 मध्ये व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर मजूर खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक.
जून 1945 मध्ये “व्हॉट काँग्रेस ॲंड गांधी हॅव डन टू द अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन
20 जून 1945 मध्ये मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
ऑक्टोबर 1946 मध्ये “हू वेअर द शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. तसेच डॉ. आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.
29 ऑगस्ट 1947 मध्ये स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
फेब्रुवारी 1948 मध्ये घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण केले.
15 एप्रिल 1948 मध्ये डॉ. शारदा कबीर (सविता आंबेडकर) यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह संपन्न झाला.
4 नोव्हेंबर 1948 मध्ये घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
1 सप्टेंबर 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली होती.
5 फेब्रुवारी 1951 मध्ये भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले होते.
जुलै 1951 मध्ये "भारतीय बौद्ध जनसंघ संस्था" स्थापन केली.
27 सप्टेंबर 1951 मध्ये मंत्रीमंडळातील कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड झाली होती.
5 जून 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) ही पदवी प्रदान केली.
12 जानेवारी 1953 मध्ये हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
डिसेंबर 1954 मध्ये म्यानमारमधील रंगून येथे भरलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभागी झाले.
मे 1956 मध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. "प्रबुद्ध" भारत साप्ताहिक सुरू केले.
जून 1956 मध्ये पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.
14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा घेतली, आणि आपल्या सुमारे 5 लक्ष अनुयायांना बासीस प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षा दिली.
15 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरात उशिरा पोहचलेल्या 2 ते 3 लाख अनुयायांना धम्माची दीक्षा दिली.
नोव्हेंबर 1956 मध्ये नेपाळच्या काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला. तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे अलीपूर रोड निवास्थानी महापरिनिर्वाण झाले.
7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
राष्ट्रीय सन्मान:
भारतरत्न :
डॉ.आंबेडकरांना मरणोत्तर "भारतरत्न" हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार 1990 मध्ये प्रदान करण्यात आला. आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे भारत सरकारने एप्रिल 1990च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरवले गेले. डॉ. आंबेडकरांना दिलेला ‘भारतरत्न' पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते डॉ. सविता आंबेडकर यांनी स्वीकारला. 14 एप्रिल 1990 हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल/ अशोक हॉलमध्ये संपन्न झाला होता.
मानद पदव्या:
डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) :
डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी) ही सन्माननीय पदवी 5 जून 1952 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने प्रदान केली. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक' असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.
डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) :
डी.लिट. ही सन्माननीय पदवी 12 जानेवारी 1953 रोजी तेलंगाणा राज्यातील हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाने प्रदान केली.
बौद्ध उपाध्या:
भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'बोधिसत्व' व 'मैत्रेय' मानतात. 1955 मध्ये काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते.
टपाल तिकिटे:
भारतीय टपालने 1966,1973,1991, 2001आणि 2013 मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय 2009,2015,2016 व 2017 मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.
नाणे:
भारत सरकारने 1990 मध्ये आंबेडकरांची 100वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ ₹1 चे नाणे काढले होते.
आंबेडकरांची 125व्या जयंतीच्या निमित्ताने ₹10 आणि ₹125 ची नाणी 2015 मध्ये काढले गेले होते. या सर्व नाण्यांवर एका बाजूला आंबेडकरांचे चित्र कोरलेले होते.
तैलचित्रे:
महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रालयातील इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र व त्यासोबत संविधान प्रस्ताविकेचे अनावरण 9 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे तैलचित्र रमेश कांबळे यांनी साकारले होते.
"द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम":
कोलंबिया विद्यापीठाने 2004 मध्ये आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. 2004 मध्ये आपल्या स्थापनेला 250 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता. "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या 450 वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.
गुगल डुडल:गुगलने 14 एप्रिल 2015 रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा 124वा जन्मदिवस साजरा केला होता. हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.