डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती: शिक्षक दिन
जन्मदिन: 5 सप्टेंबर
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरूत्ताणी या गावी झाला.सर्वपल्ली हे त्यांच्या पूर्वजांचे गाव आणि अय्यर हे त्यांचे आडनाव. तेथून जवळच तिरूपती बालाजी हे तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्रांचा आणि घरच्या संस्कारमय वातावरणाचा त्यांच्यावर संस्कार झाला.त्यांच्या घरात तेलुगु भाषा बोलली जात असे. वडील एका जमीनदाराकडे नोकरी करत. त्यामुळे घरात मोठा व्यवसाय, जमीनदारी, उत्पन्नाचे मोठे स्रोत असे काही नव्हते. मात्र घरातील संस्कार नीतिमत्ता, चारित्र्य हीच कुटुंबाची श्रीमंती होती.राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्ताणी या गावी झाले तर पुढील शिक्षण तिरूपती या गावी झाले. तेथील लुथरन मिशन स्कूलमध्ये चार वर्षे त्यांनी अध्ययन केले. ते स्वभावाने संकोची, एकांतप्रिय होते. प्रकृती कृशच होती. ते वाचनात रमणारे, विचार करणारे, गंभीर प्रकृतीचे होते. त्यांना कळू लागल्यापासून त्यांचा असा दृढ विश्वास होता की या सृष्टीव्यापारांच्या मागे एखादी अदृश्य शक्ती वास करीत असावी. त्यांचा पिंड पुस्तक वाचनातून घडला.
ते म्हणत, “माझा दृष्टिकोन व्यापक करण्याचे आणि माझ्या भव्य स्वप्नांची सृष्टी निर्माण करण्याचे काम पुस्तकांनीच केले आहे. पुस्तकांनाच मी माझा मार्गदर्शक आणि विश्वासू मित्र मानतो. "
हायस्कूलमधील चार वर्षांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वेलोरच्या 'व्हरीस कॉलेज' मध्ये प्रवेश घेतला. तेथून ते मॅट्रिक पास झाले. पुढच्या शिक्षणासाठी ते चेन्नईला गेले. चेन्नई तामिळनाडू राज्यात येते. ते तिरूत्ताणीपासून 60 किलोमीटरवर आहे. चेन्नईच्या ख्रिश्चन कॉलेजमधून ते बी.ए. 1905 साली पास झाले. पुढे त्यांनी एम.ए. करण्याचे ठरविले. तत्त्वज्ञान अध्ययनाचा मुख्य विषय होता. हा विषय घेऊन एम.ए. करणारे 1908 साली ते एकमेव विद्यार्थी होते. एम.ए. ची पदवी घेण्यासाठी त्यावेळी विद्यार्थ्यांना एक प्रबंध लिहावा लागत असे. राधाकृष्णन यांनी 'वेदान्तातील नीतिशास्त्र' हा विषय निवडून त्यावर प्रबंध लिहिला. त्यावेळी ते 20 वर्षांचे होते. त्यावेळी राधाकृष्णन यांचे शिक्षक होते, प्रा. हॉग. त्यांचा प्रबंध वाचल्यावर प्रा. हॉग म्हणतात, "हा प्रबंध वाचल्यानंतर जाणवते की, या विद्यार्थ्याजवळ सखोल ज्ञान आहे. तत्त्वज्ञानातील प्रमुख गोष्टी तर त्याला ठाऊक आहेतच; पण संभ्रमात पाडणारे प्रश्नही तो आपल्या बुद्धीने सहज सोडवू शकतो. त्याशिवाय, इंग्रजी भाषेवर त्यांचे अनन्यसाधारण असे प्रभुत्व आहे.' "
हा प्रबंध पुढे 1911 मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरूंगात असताना हा प्रबंध त्यांना वाचण्यासाठी पाठविण्यात आला.प्रबंध वाचून टिळकांनी संतोष व्यक्त केला आणि त्यांच्यात त्यांना भविष्यकालीन 'तत्त्वज्ञ' लपलेला आहे याची जाणीव झाली.
शिक्षण क्षेत्रातील कामगिरी:
चेन्नईमधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक
एम.ए.ची पदवी प्राप्त केल्यावर राधाकृष्णन यांची चेन्नईमधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये नियुक्ती झाली.
तेथे ते तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र हे विषय शिकवत. 1909 ते 1917 अशी 8 वर्षे सलग त्यांनी तेथे अध्यापन केले.
प्राध्यापकपदी नियुक्ती झाली तेव्हा ते फक्त 20 वर्षांचेच होते.प्राध्यापक झाले तरी राधाकृष्णन यांनी कधी सूट, बूट घातला नाही. तो इंग्रजांचा असूनही ते भारतीय पेहरावातच वावरले. ते पांढरे तलम धोतर वापरत. अंगात शेरवानीसारखा बंद गळ्याचा कोट घालत. डोक्यावर दक्षिणी पद्धतीचा फेटा घालत. डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा असे आणि पायात पंपशू घालत. त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ शिकविण्यात गेला. त्यांनी भारतीय विदयार्थ्यांना शिकवलेच; पण परदेशात जाऊन तेथील विद्यार्थ्यांनाही शिकवले.
म्हैसूरला महाराजा कॉलेजमध्ये प्राध्यापक:
राधाकृष्णन यांची वाणी आणि लेखणीचा प्रभाव समाजातल्या विचारवंतांवर पडू लागला. त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यात एक होते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया. सर विश्वेश्वरैया हे प्रतिभावंत इंजिनिअर होते. त्यावेळी ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्यांनी राधाकृष्णन यांना म्हैसूरला बोलावून घेतले आणि त्यांना म्हैसूर विदयापीठांतर्गत महाराजा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्रमुख प्रोफेसर म्हणून सन्मानाने बसवले. हा त्यांच्या व्यासंगाचा, अध्ययनशीलतेचा गौरव होता. महाराजा कॉलेजमध्ये राधाकृष्णन तन्मयतेने शिकवत. ते उच्च विद्वत्ताधारक होते हे विद्यार्थ्यांना समजले; पण त्यांना शंका आली की आपले सर जर एवढे विद्वान आहेत तर त्यांनी परदेशात जाऊन एखादी पदवी का नाही घेतली. एका विदयार्थ्याने त्यांची शंका एकदा भीत भीतच आपल्या सरांना विचारली. तेव्हा राधाकृष्णन त्या विदयार्थ्याला म्हणाले, "मी युरोपला शिकायला नाही; पण शिकवायला जरूर जाईन." केवढा हा दुर्दम्य आत्मविश्वास !
राधाकृष्णन यांचे पांडित्य आणि अध्यापन कौशल्य यांची थोरवी ऐकून अनेक बाहेरचे विद्यार्थी म्हैसूरला येत, व्याख्याने ऐकत आणि आपण राधाकृष्णन यांचे विद्यार्थी आहेत हे अभिमानाने सांगत. त्यांच्याविदयार्थ्यांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो हे एक होते. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेले निजलिंगप्पाही होते. निजलिंगप्पा हे तर बंगलोरच्या सेंट्रल कॉलेज ऑफ सायन्सचे विद्यार्थी; पण जेव्हा जेव्हा ते म्हैसूरला येत तेव्हा तेव्हा राधाकृष्णन यांचे व्याख्यान ऐकल्याशिवाय परत जात नसत.
कोलकता विद्यापीठात प्राध्यापक:
1921 सालची गोष्ट कोलकता विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची जागा रिक्त झाली. म्हणून कोलकता विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी एका विद्वान प्राध्यापकाच्या शोधात होते. त्यांना तत्त्वज्ञान या विषयाच्या 'पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंटसाठी' व्यासंगी प्राध्यापक हवा होता. म्हणून त्यांनी राधाकृष्णन या प्रतिभाशाली तरुणाची निवड केली. तेव्हा राधाकृष्णन यांचे वय 32 होते.आपले आवडते प्राध्यापक म्हैसूर सोडून कोलकत्याला जाणार हे ऐकून विदयार्थ्यांना वाईट वाटले. आता आपणाला त्यांच्या अध्यापनाचा, ज्ञानाचा लाभ होणार नाही म्हणून ते नाराज झाले; पण प्रत्यक्ष सरांना निरोप देण्यासाठी विद्यार्थी जमले तेव्हा त्यांनी घोडागाडीमध्ये त्यांचे सामान भरण्यास मदत केली. एवढेच नाही तर त्या घोडागाडीला फुलांनी सजवले. सर जेव्हा घोडागाडीत बसले, तेव्हा गाडीचे घोडे सोडून मुलांनी स्वतः गाडीला जपून घेतले. स्वतः गाडी ओढत रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचते केले. त्या गाडीला जुंपून घेण्यात त्यांना आनंदच वाटला. मात्र प्रत्यक्ष निरोपाची वेळ आली तेव्हा सर्व जण गहिवरले. सर्वांच्या दृष्टीने तो आनंदाच्या अश्रूंचा दिवस होता.1921 ते 1931 अशी सलग 10 वर्षे राधाकृष्णन यांनी कोलकाता विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे अध्यापन केले. या काळात त्यांनी ग्रंथलेखनही केले.
देशात आणि परदेशातील व्याख्याने:
कोलकाता विद्यापीठात अध्यापन करत असताना अधूनमधून परदेशातही व्याख्यानांना जात. 1926 ते साली त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात एक व्याख्यान माला गुंफली. 'ॲप्टन व्याख्यानमाला' या शीर्षकाच्या व्याख्यानमालेत त्यांनी सलग 6 व्याख्याने दिली. पुढे त्या व्याख्यानांचे पुस्तकही निघाले. व्याख्यानाचा विषय होता ‘हिंदूंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन'. ही व्याख्यानमाला फारच गाजली. यापूवी महाकवी गटे, कांट आणि मॅक्समूलर यांनी भारताचे श्रेष्ठत्व दाखवून दिले होतेच; पण राधाकृष्णन यांनी भारताच्या महानते बरोबरच त्याची मोहकताही दाखवून दिली.ऑक्सफर्ड विद्यापीठातील व्याख्यानमालेनंतर लगेचच त्यांनी केंब्रिज विद्यापीठातही व्याख्याने दिली. तेथे विषय होता. 'ब्रँडले आणि शंकराचार्य' या व्याख्यानात त्यांनी हिंदू धर्माचे उदात्त स्वरूप जगापुढे मांडले आणि एका परतंत्र देशातील धर्म देखील महान असू शकतो, तो जगाला शांतीची शिकवण देऊ शकतो व ज्ञानाची क्षितिजे रूंदावू शकतो हे सिद्ध करून दाखवले.ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानानंतर ते लगेचच अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भरणाऱ्या 'जागतिक तत्त्वज्ञान परिषदेला' उपस्थित राहिले.हॉर्वर्ड विद्यापीठात त्यांनी 'आधुनिक सुधारणेतील अध्यात्मिक उणीव' या विषयावर व्याख्याने दिली. बेकारी व जागतिक अशांतता या प्रश्नांनी धास्तावलेल्या अमेरिकनांना हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानच शांती व समाधान देऊ शकेल हे उदाहरणांनी पटवून दिले.युरोप, अमेरिकेतल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी तिकडील विद्वानांची मने जिंकली. स्वामी विवेकानंदानंतर 33 वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय विद्वत्तेचा गौरव परदेशात झाला. त्याबद्दल राधाकृष्णन लिहितात, “ऑक्सफर्ड, केंब्रिज, हॉर्वर्ड, प्रिन्स्टन, येल आणि शिकागो तसेच अन्य ठिकाणी माझे जे हार्दिक स्वागत झाले. त्याची आठवण मी कधीच विसरू शकत नाही.'
त्यांची परदेशातील ही कर्तृत्वाची भरारी सर्वांना समजली. म्हणून आपल्या या भूमीपुत्राचा गौरव करावा असे आंध्र विदयापीठाला वाटले. म्हणून एका शानदार समारंभात त्यांनी राधाकृष्णन यांना 'डी. लिट' ही बहुमानाची पदवी बहाल केली. त्यानंतर भारतातल्या अनेक नामंकित विदयापीठांनी राधाकृष्णन यांचा सन्मान केला. पूर्वी ते फक्त तत्त्वज्ञान, विषयाचे प्राध्यापक होते. या पदव्यांमुळे आता ते 'डॉक्टर' झाले.
ग्रंथ निर्मिती:
म्हैसूर येथे राधाकृष्णन यांनी 3 वर्षे अध्यापन केले. या काळात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुखपद सांभाळतानाच त्यांनी दोन पुस्तके लिहिली.
(1) रवींद्रनाथ टागोर यांचे तत्त्वज्ञान
(2) समकालीन तत्त्वज्ञानामध्ये धर्माचे स्थान.
या पुस्तकांमुळे राधाकृष्णन यांना प्रसिद्धी तर मिळालीच; पण रवींद्रनाथांचे प्रेमही मिळाले.
रवींद्रनाथ लिहितात, "आपण लिहिलेल्या पुस्तकाच्या सौंदर्याबद्दल काय लिहू? माझ्या तत्त्वज्ञानावर एवढे सुंदर पुस्तक अन्य कोणी लिहू शकेल की नाही, याविषयी मला शंकाच आहे."
'समकालीन तत्त्वज्ञानात धर्माचे स्थान' या पुस्तकाचे राधाकृष्णन यांना तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून दिले. हे पुस्तक इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाले आणि केंब्रिज ऑक्सफर्ड इत्यादी नामवंत विदयापीठांनी ते अभ्यासक्रमासाठी निवडले. या पुस्तकांच्या प्रसिद्धीमुळे म्हैसूरमधल्या महाराजा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला.
त्यांच्या ग्रंथांची शीर्षके:
1) इंडियन फिलॉसफी भाग 1 व भाग 2
2) दि हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ
3) दि रिलिजन वुई नीड
4) कल्कि - दि फ्यूचर ऑफ सिव्हिलायझेशन
हे सर्वच ग्रंथ अभ्यासपूर्ण आहेत. 'कल्कि' अर्थात मानवी संस्कृतीचे भवितव्य. या आपल्या ग्रंथात राधाकृष्णन म्हणतात,
" विज्ञानाने माणसाला भौतिक सुखाची साधने मिळवून दिली. त्यामुळे चैन वाढली; पण माणूस खरोखरीच सुखी होऊ शकला का ? माणूस फक्त शरीरसुखावर समाधानी राहू शकत नाही, तर शरीराव्यतिरिक्त त्याला आत्मा व बुद्धीही आहे. हे विज्ञान आत्म्याची भूक भागवू शकते का? तर उत्तर नकारात्मक येते. विज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी जोपर्यंत माणसांमधील सहकार्य व सद्भाव वाढत नाही, तो सहजीवनाने जगणार नाही, तोपर्यंत जगात शांती नांदू शकणार नाही. विज्ञान केवळ भौतिक सुख देऊ शकेल; पण आंतरिक सुखाचे काय? त्यासाठी तुम्हाला ईश्वराकडे जावे लागेल. साऱ्या विश्वातील बांधवांचे कल्याण ईश्वर करीत असतो. माणसांनी द्वेष, धर्मांधता, स्वार्थ यात गुंतून राहू नये.'
पुढे 1916 साली लोकमान्यांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथात लोकमान्यांनी राधाकृष्णन यांच्या लेखातील काही उद्धरणे उद्धृत केली होती. याचा आनंद राधाकृष्णन यांना झालाच; पण हा आपला मोठा गौरव आहे असे त्यांना वाटले.
विद्यापीठाचे कुलगुरू:
1931 ते 1936 या 5 वर्षांच्या काळात त्यांनी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळले. आता ते तत्त्वज्ञानाचे क्षेत्र व शिक्षण क्षेत्र यात लीलया विहार करू लागले. आंध्र विद्यापीठ नुकतेच सुरू झाले होते. तेथे त्यांनी अनेक सुधारणा केल्या व अनेक विषयांचे विभाग सुरू केले. आंध्र विदयापीठाचे कुलगुरूपद सांभाळत असतानाच ते कोलकाता विद्यापीठाचे मानद प्राध्यापक होते. म्हणून कोलकाता विद्यापीठातही त्यांना अधूनमधून व्याख्यानांना जावे लागे.बनारस हे उत्तर भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याला 'काशी' असेही म्हणतात. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पंडित मदन मोहन मालवीय यांनी 'बनारस 'हिंदू विश्वविद्यालय' स्थापन केले होते. येथे हिंदू धर्माचा साकल्याने अभ्यास केला जातो. मदन मोहन मालवीय यांनी अनेक वर्ष या विश्वविद्यालयाची जबाबदारी स्वीकारली व ती यशस्वीपणे पार पाडली. पुढे त्यांचे वय झाले. म्हणून आपल्या जागेवर योग्य व्यक्ती हवी अशी त्यांनी गांधीजींच्याकडे विनंती केली. तेव्हा गांधीजींच्या डोळ्यापुढे डॉ. राधाकृष्णन यांचे नाव आले; परंतु राधाकृष्णन यांच्याकडे अनेक कामे होती. त्या व्यापातून ते वेळ देतील का असा प्रश्न होता; परंतु गांधीजींनी प्रस्ताव ठेवल्यावर राधाकृष्णन यांनी त्याला मान्यता दिली आणि ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलगुरू झाले. मात्र राधाकृष्णन यांनीही कार्यभार स्वीकारण्यापूर्वी मालवीयजी यांना एक अट घातली. ती अट म्हणजे "मी येथे वेतन घेणार नाही. मात्र जमेल तेवढी सेवा मनापासून करीन."बनारस हिंदू विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते नेहमी सांगत,
"उत्तम अभ्यास करा. चांगले गुण मिळवा. आधी शिक्षण घ्या आणि मग राजकारणाकडे वळा. ."
त्यांच्या मते,
"नवसमाज निर्मितीचा पाया शिक्षण हाच आहे. शिक्षणाशिवाय व्यक्तीचा किंवा राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. म्हणून परिपक्व व्यक्तिमत्त्व घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. विदयार्थ्याला माहितीबरोबर ज्ञानही पाहिजे. शिक्षणामध्ये नैतिकता आणि अध्यात्मिकता या मूल्यांना विशेष स्थान असले पाहिजे. शालेय वातावरण हे प्रेम, पावित्र्य आणि प्रतिष्ठा जपणारे असले पाहिजे. मूल्यशिक्षण हा पाठ्यपुस्तकी विषय नाही. तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा आणि जगण्याचा विषय आहे. त्याचा प्रत्यय आणून देण्यासाठी शिक्षकाला खूप कष्ट घ्यावे लागतील. मग त्यातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही जीवन आनंदी, कृतार्थ आणि सफल होईल."
बनारस हिंदू विश्वविद्यालयात कुलगुरू म्हणून. 9 वर्षे सेवा केल्यानंतर ते तेथून निवृत्त झाले. ते साल होते 1948.
राष्ट्रसंघाचे सदस्य:
राधाकृष्णन यांची 'लीग ऑफ नेशन्स' म्हणजेच 'राष्ट्रसंघ' या संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. पहिल्या महायुद्धानंतर देशोदेशीचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापन झाली होती. त्याचे मुख्य कार्यालय स्वित्झलँड येथील जिनिव्हा शहरात आहे.
1939 सालापर्यंत म्हणजे ही संस्था बंद होऊन तिचे रूपांतर 'युनायटेड नेशन्स' (यूनो) असे होईपर्यंत त्यांनी राष्ट्रसंघाचे सदस्यत्व निभावले.
पूर्वेकडील म्हणजे आपल्याकडील तत्त्वज्ञानाची ओळख राधाकृष्णन यांनी अनेक व्याख्यानातून व ग्रंथांतून करून दिली. त्याचाच एक भाग म्हणून 1936 मध्ये पूर्वेकडील तत्त्वज्ञानाचे खातेच ऑक्सफर्ड विद्यापीठात निर्माण झाले.
अशा बहुमानाच्या जागेवर सलग 15 वर्षे नियुक्ती होणारे राधाकृष्णन हेच पाहिले भारतीय होत. त्यासाठी त्यांना सहा महिने इंग्लंडमध्ये तर सहा महिने भारतात वास्तव्य करून अध्यापन करावे लागले.एकदा जपानचे गांधी डॉ. कागावा हे महात्मा गांधीजींना भेटावयास भारतात आले होते. गांधीजींची भेट झाल्यावर व विविध विषयांवर चर्चा झाल्यावर डॉ. कागावा यांनी भारत देश पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
तेव्हा गांधीजी, डॉ. कागावा यांना म्हणाले,
'तुम्हाला जर खराखुरा हिंदुस्थान पहावयाचा असेल, तर आग्रा येथील ताजमहाल, शांतिनिकेतनातील रवींद्रनाथ टागोर आणि पाँडिचेरीच्या आश्रमातील महर्षी अरविंद घोष या तीन गोष्टींबरोबरच सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ डॉ. राधाकृष्णन यांची अवश्य भेट घ्या.
गांधीजीनी केलेल्या या शिफारशीत डॉ. राधाकृष्णन यांची महानता अधोरेखित होते, यात काय संशय!
विदयापीठ आयोग अध्यक्ष:
देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणाची पुनर्रचना करणे आवश्यक होते.
राष्ट्राच्या समस्या, गरजा, ध्येय आणि उद्दिष्टे यानुसार शिक्षणाची रचना करणे आवश्यक होते म्हणून स्वतंत्र भारताच्या सरकारने एक विदयापीठ आयोग स्थापन केला. या आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची निवड केली. पुढे या विदयापीठ आयोगालाच लोक 'राधाकृष्णन आयोग' म्हणू लागले. या आयोगाचा अहवाल 1950 मध्ये राधाकृष्णन यांनी केंद्र सरकारला सुपूर्द केला.
युनेस्कोत कार्यकारी मंडळावर भारताचे प्रतिनिधी:
1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपले; परंतु देशादेशांमध्ये सलोख्याचे संबंध रहावेत म्हणून यूनोची स्थापना झाली.
या यूनोचीच एक शाखा म्हणजे युनेस्को - म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायन्टिफिक, कल्चरल ऑर्गनायझेशन'.
युनेस्कोचे मुख्य कार्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आहे. या युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. 1948 पासून त्यांनी युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर प्रभावीपणे काम केले. पुढे 1952 मध्ये ते युनेस्कोचे अध्यक्ष झाले. त्यांनी केलेल्या भरीव कामामुळे युनेस्कोने त्यांचा सत्कारही केला.1946 ते 1949 या कालावधीत त्यांनी भारतीय राज्यघटना समितीचे सभासद म्हणून काम केले.तर 1949 ते 1952 या कालावधीत रशियात भारताचे राजदूत म्हणून काम केले. रशियामध्ये राजदूतपदी राहून कार्य करताना त्यांच्या ज्ञानाची महती हुकुमशहा हे स्टॅलिन यांच्या कानावर गेली. हे राजदूत 18-18 तास अभ्यास करतात हे ऐकून ते अचंबित झाले आणि कोणालाही भेट न देणारे हुकूमशहा स्टॅलिन यांनी डॉ. राधाकृष्णन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांमध्ये सौहार्दपणे बोलणी झाली.
स्टॅलिन यांना राधाकृष्णन यांची विद्वत्ता, सहृदयता कळून आली. पुढे स्टॅलिन आजारी पडले तेव्हा भारतात येण्यापूर्वी राधाकृष्णन यांनी स्टॅलिनची पुन्हा भेट घेतली. तेव्हा ते आजारी होते. त्यांचा चेहरा सुजला होता. स्टॅलिनची ती अवस्था पाहून राधाकृष्णन त्यांच्या जवळ गेले. प्रेमाने गालावरून, पाठीवरून हात फिरवला. तो हस्तस्पर्श त्यांना एखादया देवदुताचाच वाटला. मार्शल स्टॅलिन आणि राधाकृष्णन यांची ही भेट राजशिष्टाचाराला धरून नव्हती. तो एक संकेतभंगच होता. स्टॅलिनने त्याच्या प्रवृतीप्रमाणे राज्यकर्त्यासारखे वागायला हवे होते, तर राधाकृष्णन यांनी भारताचे प्रतिनिधी या नात्याने शिष्टाचार मर्यादितच वागायला हवे होते. पण ते दोघे इतके जवळ आले होते की शिष्टाचाराच्या पलीकडे त्यांचे नाते पोहोचले होते. त्या भेटीनंतर पुढे सहाच महिन्यांनी स्टॅलिन यांचे निधन झाले.
भारताचे उपराष्ट्रपती ते राष्ट्रपती:
15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1952 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. नंतर संसदेने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची राष्ट्रपतीपदी निवड केली तर डॉ. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. 1952 ते 1962 अशी 10 वर्षं ते भारताचे उपराष्ट्रपती होते. नंतर 1962 साली डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निवृत्तीनंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून विराजमान झाले. 1962 ते 1967 अशी 5 वर्षे ते भारताचे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असताना त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या व शेजारच्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.
भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.
निधन:
राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर ते तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथे वास्तव्यास गेले. तेव्हा ते 79 वर्षांचे होते. उतारवयात त्यांचे वाचन, लेखन, चिंतन, मनन सुरूच होते. पुढे 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. 87 वर्षांची त्यांची अखंड कारकीर्द प्रेरणादायी ठरली.
प्राध्यापक, कुलगुरू, नामांकित विद्यापीठात व्याख्याने, राष्ट्रसंघाचे सदस्य, विदयापीठ आयोगाचे अध्यक्ष, युनेस्कोचे सदस्य व पुढे अध्यक्ष, रशियातील भारताचे राजदूत, 10 वर्षे भारताचे उपराष्ट्रपती व पुढे 5 वर्षे राष्ट्रपती, अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथांचे लेखन अशी त्यांची दैदिप्यमान कारकीर्द आहे. त्यांचा जन्मदिवस हा 'शिक्षक दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यांच्या जीवनचरित्रातून व कार्यातून स्फूर्ती घेऊन आपणही त्या जीवनवाटेवरून यथासांग वाटचाल करण्याचा संकल्प करूया.